भाजप नगरसेवक संतोष गायकवाड यांचे निधन...| BJP corporator Santosh Gaikwad passes away ...| santosh gaikwad

संभाजीनगर, वारे वसाहत येथील भाजपचे नगरसेवक संतोष गायकवाड (वय 43) यांचे निधन झाले. गायकवाड यांच्या वडिलांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

भाजप नगरसेवक संतोष गायकवाड यांचे निधन...| BJP corporator Santosh Gaikwad passes away ...| santosh gaikwad
भाजप नगरसेवक संतोष गायकवाड यांचे निधन...

santosh gaikwad : 

भाजप नगरसेवक संतोष गायकवाड यांचे निधन...

संभाजीनगर, वारे वसाहत येथील भाजपचे नगरसेवक संतोष गायकवाड (वय ४३) यांचे निधन झाले. गायकवाड यांच्या वडिलांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. गायकवाड यांनाही कोरोनासद‍ृश लक्षणे होती. परिणामी, त्यांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याचा संशय व्यक्‍त केला जात आहे.

गायकवाड यांनी २०१० मध्ये महापालिकेची निवडणूक लढविली होती; पण त्यांना यश मिळाले नाही. २०१५ मध्ये भाजपकडून ते विजयी झाले. महापालिकेतील कामगारांच्या प्रश्‍नाविषयी ते सभागृहात प्रशासनाला खडेबोल सुनावत. ते संभाजीनगर प्रभागाचे नेतृत्व करत होते. गायकवाड यांच्या निधनाने महापालिकेत गरिबांच्या प्रश्नावर सातत्याने आवाज उठविणारा आवाज बंद झाल्याची प्रतिक्रिया नगरसेवकांनी व्यक्‍त केली.

गायकवाड यांच्या मागे आई, वडील, पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ असा परिवार आहे.

गंजीमाळमधील एका महिलेचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचे नातेवाईक असलेल्या वारे वसाहतमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. संबंधित मृत महिला नगरसेवक गायकवाड यांच्या नातेवाईक होत्या. त्यानंतर रुग्णांना रुग्णालयात पाठविणे, परिसरात औषध फवारणी यासाठी ते रात्रंदिवस भागात फिरत होते. पाच दिवसांपासून त्यांची प्रकृती बिघडली होती. परंतु, प्रभागातील आरोग्यविषयक कामामुळे त्यांनी तब्येतीकडे दुर्लक्ष केले.

दोन दिवसांपूर्वी गायकवाड यांच्या वडिलांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यांच्यावर सीपीआरमध्ये उपचार सुरू आहेत. महापालिका प्रशासनाकडून गायकवाड यांनाही तपासणी करून घेण्यासाठी सांगण्यात आले होते. शनिवारी ते तपासणीसाठी जाणार होते. दुपारी श्‍वास घेण्यासाठी त्रास होऊ लागल्याने ते खासगी हॉस्पिटलमध्ये गेले. तेथून घरी येऊन विश्रांती घेतली; मात्र घरात त्यांना पुन्हा त्रास सुरू झाला. कार्यकर्त्यांनी त्यांना मोटारसायकलवरून तातडीने सीपीआरमध्ये दाखल केले. गायकवाड यांची प्रकृती खूपच बिघडल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. परंतु, त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्यावर पंचगंगा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. गायकवाड यांच्या निधनाने वारे वसाहत, संभाजीनगर परिसरात हळहळ व्यक्‍त होत आहे.

उत्कृष्ट हॉकीपटू, फुटबॉलपटू...

दि न्यू एज्युकेशन सोसायटीच्या न्यू हायस्कूलचे विद्यार्थी असणारे संतोष गायकवाड उत्कृष्ट हॉकीपटू होते. १९८०-८२ या कालावधीत राज्यस्तरीय शालेय हॉकी स्पर्धेत यांनी भाग घेतला होता. धाडसी खेळाडू म्हणून त्यांची ओळख होती. नगरसेवक झाल्यावरही त्यांनी हॉकीच्या विकासासाठी प्रयत्न सुरू ठेवले. फुटबॉलमध्येही त्यांचे विशेष प्रावीण्य होते. कॉलेजनंतर त्यांनी जय भवानी स्पोर्टस् इन्स्टिट्यूट संघामधून फुटबॉल खेळण्यास सुरुवात केली. संघात डिफेन्स व स्टॉपर म्हणून ते खेळत होते. सामाजिक कार्यातही ते सक्रिय होते. कोरोनामुळे महापौर चषक फुटबॉल स्पर्धा रद्द झाली. या स्पर्धेत खेळण्याची त्यांची इच्छा अपुरी राहिली.