कोळसेवाडी पोलिस स्टेशन अंतर्गत वाढत्या गुन्हेगारीबाबत भाजपाचे अपर पोलीस आयुक्तांना साकडे...
गेल्या काही दिवसांत कोळसेवाडी पोलीस स्टेशन अंतर्गत कल्याण पूर्वेत विविध ठिकाणी गुन्हेगारीचे प्रमाण वाढले असून या वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे यांची भेट घेतली.

कोळसेवाडी पोलिस स्टेशन अंतर्गत वाढत्या गुन्हेगारीबाबत भाजपाचे अपर पोलीस आयुक्तांना साकडे...
कल्याण : गेल्या काही दिवसांत कोळसेवाडी पोलीस स्टेशन अंतर्गत कल्याण पूर्वेत विविध ठिकाणी गुन्हेगारीचे प्रमाण वाढले असून या वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे यांची भेट घेतली.
लॉकडाऊन खुले केल्यापासून कल्याण पूर्वेत घरफोडी, गाड्या तोडफोड, मोबाईल चोरी, गाड्या चोरी, मारहाणीचे प्रमाण वाढले आहे. तसेच पत्रीपूल परिसरात नशेच्या पदार्थांची खुलेआम विक्री होत असल्याने मोठ्या संख्येने तरुणाई नशेच्या आहारी जात आहे. या वाढत्या गुन्हेगारी बाबत भाजपा जिल्हा अध्यक्ष शशिकांत कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली व कल्याण पूर्व मंडळ अध्यक्ष संजय मोरे यांच्या अध्यक्षतेखाली अप्पर पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे यांची कल्याण खडकपाडा येथे भेट घेऊन लक्ष वेधण्यात आले. तसेच या गुन्हेगारीला आळा बसविण्यासाठी काय उपाययोजना करता येतील त्याबाबत चर्चा करण्यात आली.
अपर पोलीस आयुक्त कराळे यांनी तत्काळ संबंधित कोळसेवाडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना संपर्क करून योग्य कारवाई करण्याचे आदेश दिले. यावेळी कल्याण पूर्वे भाजपा सरचिटणीस नितेश म्हात्रे, नरेंद्र सूर्यवंशी, संतोष चौधरी, अरुण दिघे, बाळू शेख, आदींसह महिला व पुरुष कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तसेच कल्याण तालुक्यात आलेल्या पुरामुळे नागरिकांचे मोठे नुकसान झाले असून तहसीलदार कार्यालयामार्फत झालेल्या या नुकसानीचे पंचनामे देखील करण्यात आले. मात्र अद्यापही या नागरिकांना नुकसानभरपाई न मिळाल्याने याबाबत भाजपाच्या शिष्टमंडळाने तहसीलदार दीपक आकडे यांची भेट घेतली. यावेळी या नुकसानग्रस्त नागरिकांना लवकरात लवकर नुकसानभरपाई देण्याची मागणी करण्यात आली.
कल्याण, ठाणे
प्रतिनिधी - कुणाल म्हात्रे
___________