कोरोना: जाणून घ्या होम आयसोलेशन आणि क्वारंटाईन म्हणजे काय

Isolation and quarantine are public health practices used to protect the public by preventing exposure to people who have or may have a contagious disease.

कोरोना: जाणून घ्या होम आयसोलेशन आणि क्वारंटाईन म्हणजे काय

कोरोना: जाणून घ्या होम आयसोलेशन आणि क्वारंटाईन म्हणजे काय

१४ व्या शतकात आलेल्या प्लेग च्या साथीने संपूर्ण जगाला विळखा घातला होता. या काळात व्हेनिस शहराच्या बंदरात दाखल होणाऱ्या बोटींमधील प्रवासी अथवा खलाशी ४० दिवस बाहेर येऊ शकत नव्हते. बोटीवरच्या कोणालाही प्लेग किंवा इतर संसर्गजन्य आजार नसल्याची खात्री या ४० दिवसांमध्ये केली जात असे आणि मगच बोटीवरील नागरीकांना बाहेर पडण्याची परवानगी मिळत असे. 
यावरूनच 'क्वारंटिना' हा मूळ इटालियन शब्द वापरात येऊ लागला. या शब्दाचा अर्थ होतो -४० आणि त्याचाच अपभ्रंश म्हणजे 'क्वारंटाईन'. हाच शब्द सध्या सतत आपण ऐकतोय. कोरोना विषाणूची साथ जगभर पसरली असल्याने या विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांना आता क्वारंटाईन करण्यात येत आहे. यासाठी सरकारने क्वारंटाईन सेंटर्स उभारलेली आहेत. पण या सोबतच आता होम आयसोलेशन (गृह अलगीकरण) (Home Isolation) आणि होम क्वारंटाईन (गृह विलगीकरण) (Home Quarantine) असे पर्यायहि सरकारने द्यायला सुरवात केली आहे. 
मराठीत क्वारंटाईन ला विलगीकरण आणि आयसोलेशन ला अलगीकरण असे म्हणतात. कोरोना बाधित व्यक्तींच्या संपर्कात आलेले नागरिक अथवा ज्या व्यक्तींमध्ये कोरोना विषाणूची सौम्य किंवा अति-सौम्य लक्षणे दिसत आहेत अशा व्यक्तींना क्वारंटाईन करण्यात येते.  तर कोविड-१९ ची टेस्ट पॉझिटिव्ह आलेले रुग्ण ज्यांच्यामध्ये कमी लक्षणे आहेत किंवा अजिबात लक्षणे नाहीत अशा असिम्प्टोमॅटिक रुग्णांना आयसोलेशन मध्ये ठेवलं जातं. 
कोरोना हा संसर्गजन्य आजार आहे. बोलताना, शिंकताना, खोकताना उडणाऱ्या सूक्ष्म तुषारांतून तो पसरू शकतो. म्हणूनच या कोव्हिड संशयित किंवा बाधित व्यक्तींनी इतरांपासून वेगळं राहणं गरजेचं आहे.
कोविड बाधित रुग्णांची संख्या वाढत असताना केंद्र सरकारनं क्वारंटाईनचे नियम बदललेत. अति सौम्य लक्षणं आढळणाऱ्या वा लक्षणं नसणाऱ्या रुग्णांना जर त्यांच्या घरी आवश्यक त्या सुविधा असतील - म्हणजे वेगळी खोली, स्वतंत्र टॉयलेट तर त्यांच्या घरीच विलगीकरणाचा पर्याय देण्यात येत आहे.  यासाठी रुग्णाच्या संमतीची गरज असते आणि रुग्णाला एक प्रतिज्ञापत्रं भरून द्यावं लागतं.
याशिवाय ज्या रुग्णांना अतिसौम्य लक्षणं आहेत किंवा कोणतीही लक्षणे नाहीत अशा रुग्णांकडे वैद्यकीय प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे. या रुग्णाची काळजी घेण्यासाठी कुटुंबातील एका व्यक्तीने कायम हजर असणं आवश्यक आहे. काळजी घेणारी व्यक्ती आणि वैद्यकीय अधिकारी यांच्यामध्ये संपर्क व्यवस्था (दूरध्वनी, मोबाईल) असावी. होम आयसोलेशन मधील व्यक्तींना काही त्रास झाल्यास त्यांना रुग्णालयात आणण्याची सुविधा उपलब्ध असावी. 
होम आयसोलेशन (Home Isolation) मधील व्यक्तींना सतत धाप लागणे, तीन मिनिटांपर्यंत सरळ चालता न येणे, प्रचंड अंगदुखी जाणवणे, सतत ताप येणे, उलटी होणे यासारखी लक्षणे जाणवल्यास त्वरीत डॉक्टरांशी संपर्क साधावा.  

होम क्वारंटाईन (Home Quarantine)असणाऱ्या व्यक्तीने स्वतःची काळजी कशी घ्यावी?
अशा व्यक्तींनी सतत सर्जिकल ट्रिपल लेयर मास्क वापरावा व दर आठ तासांनी हा मास्क बदलणे गरजेचे आहे. 
८ तासांच्या आत जर मास्क काही कारणाने ओला झाला अथवा खराब झाला तर तो त्वरित बदलावा. 
एकदा वापरलेला सर्जिकल मास्क तुम्हाला कमीत कमी १% सोडिअम हायपोक्लोराइडमध्ये भिजवत ठेवायचा आहे आणि त्यानंतर त्याची विल्हेवाट लावावी. (सोडिअम हायपोक्लोराइडच्या ३ गोळ्या आणि एक लिटर पाण्यामध्ये तुम्हाला हे सोल्युशन बनवता येईल. )
योग्य आहार ठेवावा. भरपूर पाणी प्यावे. 
घरातील वृद्ध व्यक्ती आणि लहान मुलांपासून स्वतःला लांब ठेवावे. 
वैयक्तिक हायजीन - स्वच्छता पाळावी आणि औषधे वेळेवर घ्यावीत . डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतीही औषधं घेऊ नयेत. 

कोविड-१९ ची लक्षणे दिसणे सुरू झाल्यापासून  पुढील १७ दिवस त्या व्यक्तींना होम क्वारंटाईन पाळणे गरजेचे आहे. कोविड चाचणीसाठी नमुना ज्या दिवशी घेतला असेल तिथून १७ दिवस मोजावेत आणि मग सलग १० दिवस जर ताप नसेल तर त्या व्यक्तीला होम विलगीकरणातून मुक्त करण्यात येते. महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेल्या नियमावलीनुसार होम क्वारंटाईनचा कालावधी संपल्यानंतर कोरोना विषाणूची पुन्हा चाचणी करण्याची आवश्यकता नाही.
लक्षात ठेवा. आपल्याला सगळ्यांना मिळून या कोरोना विषाणूच्या संक्रमणाची साखळी तोडायची आहे. त्यासाठी शासनाने दिलेल्या नियमांचे तंतोतंत पालन करा. सुरक्षित रहा. सकारात्मक रहा.