सोनेरी स्वराज्याची घडण.....

सुमारे ३५० वर्षांपूर्वी आदिलशहाची फौज घोडे उधळीत पुण्यामध्ये धुडगूस घालत होती.

सोनेरी स्वराज्याची घडण.....
Rajmata Jijausaheb and Chhatrapati Shivaji Maharaj
सोनेरी स्वराज्याची घडण.....
सोनेरी स्वराज्याची घडण.....

सोनेरी स्वराज्याची घडण...

ई.स. १६३७.. सुमारे ३५० वर्षांपूर्वी, पुणे व सुपेची जहागीरी भोसले घराण्याकडे होती. चारही वेशींवरून आदिलशहाची फौज घोडे उधळीत पुण्यामध्ये धुडगूस घालत होती. घरदार पेटवली. रयतेच्या किंकाळ्या उठल्या. त्यांनी सर्वोत्र कहर केला होता. एक भली मोठी लोखंडी पहार ठोकून, तुटक्या वहाणांची तोरणं लटकवली. आदिलशाही फौजाने पुण्याचे स्मशानात रूपांतर केले होते.

सहा वर्षांनंतर हा अन्याय -अत्याचार रोखण्याचे ध्येय मनात घेऊन शहाजीराजे भोसले यांची पत्नी आणि आपल्या मुलाला, मावळी घोडेस्वारांच्या तुकडीनिशी पुण्यात झांबरे पाटलांच्या वाड्यात राहिल्या. तेव्हा जेमतेम काहीच घर जीव धरून जगत होती.

आऊसाहेबांनी मोडून-तोडून गेलेल्या कसबा गणपतीच्या देवळात  पहिला जीणोर्द्धार केला. कसबा गणपतीला दुर्वाफुलांनी सजलेले पाहून भाजून पोळून निघालेली घरं- दारं किलकीली झाली.  

पुणे पुन्हा सजू लागल. वहाणांची तोरणं,  पहार उखडली. ज्या भुई वर विजापूरच्या वजीर खवासखानाच्या हुकुमाने गाढव जुंपलेला नांगर फिरला होता त्याच भुई वर जिजाऊसाहेब आणि शिवरायांनी  हलगी- ताशांच्या कडकडाटात सोन्याचा नांगर फिरवला. आणि पुण्याचा कायापालट होऊ लागला.

रयत घाम गाळून काम करू लागली. आऊसाहेब जातीने सदरेवर न्यायनिवाडा करू लागल्या. आऊसाहेबांचा न्याय अगदी समतोल. या न्यायनिवाड्यांचे दस्तऐवज गावासले.

पुण्यातील पार्वती गावालगत असलेला आंबिल ओढा पावसाळ्यात अवतीभवतीची शेती, झोपड्या, खोपटं वाहून न्यायचा. या ओढ्याला चिरेबंदी, सहा हात रुंद, सत्तर हात लांब आणि पंचवीस हात उंच असा बांध घातला. यामुळे ओढ्याच प्रवाह पश्चिमेकडे मुठा नदीत जाऊन मिळू लागला.

 मावळी डोंगर आणि जंगलामुळे पुण्यात रानटी जनावरांनी थैमान घातल होत. या सर्वाचा बंदोबस्त आऊसाहेब आणि शिवरायांनी केला. परंतु काही मातब्भर मंडळींचा धुमाकूळ मात्र थांबला नव्हता. आऊसाहेबांच्या आज्ञेवर या मातब्भर मंडळींना जरबेत आणले गेले.   

शहाजी राज्यांच्या महत्वाकांक्षी  स्वप्नांना जिजाऊमातेने सत्यात उतरविण्याचा चंग बांधला. छत्रपती शिवाजी महाराजांची जडण - घडण लहानपणा पासून तशीच घडत होती. लहानपणीच जिजाऊसाहेब त्यांना रामायण, महाभारतातील कथा सांगत तर हिंदूंवर होणारे अन्याय होरपळणारी रयत यांची राजेंना जाणीव करून देत होत्या. या रयतेसाठी आपणच काहीतरी केले पाहिजे हे राजमाता शिवबांना निक्षून सांगत होत्या. आयाबायांवर होणारे अत्याचार त्यांना बघवत नव्हते.

आदिलशहा, निजामशहा, मोघल यांच्या अत्याचाराने पिचलेली रयत आता महाराजांची ताकद बनत होती. शिवबा बाळ सवंगड्यां बरोबर खेळतानाही निवाडे करू लागले. जिजाऊमाते च्या देखरेखी खाली स्वराज्याच्या भावी छत्रपतींना हिऱ्याचे पैलू पाडण्याचे कार्य मनापासून सुरु होते.

तो दिवस उजाडला... एक राजबिंडा तरुण आपल्या सवंगड्यांसह रायरेश्वराच्या मंदिरात स्वतःचा रक्ताने अभिषेक करून स्वराज्याची शपत घेत होता. आणि मंदिरातून सर्वांन मुखे एकच गजर झाला, 'हर - हर महादेव, हर - हर महादेव', त्या मंदिराच्या परिसरात सगळे वातावरण आनंदून गेले. स्वराज्याचा सूर्य उगवत होता.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची नांदी होत होती. अठरापगड जातींना बरोबर घेऊन  त्यांच्या हक्काच्या मराठी राज्याची पायाभरणी केली. ते म्हणजे मराठी माणसाचे ज्वलंत लढवैय्या राज्य  'स्वराज्य'.

________________