अंनिसतर्फे कल्याण मधील पहिले जटा-निर्मूलन...

कल्याण येथे राहणार्‍या एका महिलेच्या डोक्यात जटा असल्याचे निदर्शनास आणून दिल्यावर महा अंनिसचे कार्यकर्ते तृप्ती पाटील, गणेश शेलार, दत्ता आणि कल्पना बोंबे, उत्तम जोगदंड यांनी सदर महिलेची भेट घेऊन समुपदेशन केले.

अंनिसतर्फे कल्याण मधील पहिले जटा-निर्मूलन...
The first hair removal in Kalyan by Annis ...

अंनिसतर्फे कल्याण मधील पहिले जटा-निर्मूलन...

कल्याण : कल्याण येथे राहणार्‍या एका महिलेच्या डोक्यात जटा असल्याचे निदर्शनास आणून दिल्यावर महा अंनिसचे कार्यकर्ते तृप्ती पाटील, गणेश शेलार, दत्ता आणि कल्पना बोंबे, उत्तम जोगदंड यांनी सदर महिलेची भेट घेऊन समुपदेशन केले.

डोक्यात पहिल्यांदा तयार झालेली जट कापल्यानंतर मुलाचा मृत्यू झाला होता. त्यामुळे या जट कापल्यामुळेच असे झाले असा गैरसमज निर्माण होऊन महिलेच्या मनात प्रचंड भीती निर्माण झाली होती आणि त्यानंतर परत तयार झालेली जट न कापल्याने ती वाढत जाऊन खूप मोठ्या प्रमाणात केसांमध्ये जटा निर्माण झाल्या होत्या. यामुळे या महिलेच्या सामाजिक वावरावर मर्यादा आल्या होत्या. समुपदेशनादरम्यान या महिलेची भीती दूर करण्यात आली, गैरसमज दूर करण्यात आले. त्यानंतर  २७ ऑक्टोबर रोजी जटा काढण्यात याव्यात यासाठी त्यांनी सहमती दिली.

कल्याण शाखेची कार्यकर्ती आणि ब्युटी पार्लर संचालिका दुहिता जाधव हिने या महिलेची जट अत्यंत कौशल्याने काढून टाकली. तत्पूर्वी सदर महिला आणि त्यांच्या कन्येकडून सहमती-पत्र घेण्यात आले होते. यावेळी महा अंनिस राज्य सरचिटणीस सुरेखा भापकर, ठाणे जिल्हा सचिव गणेश शेलार, राज्य कार्यकारिणी सदस्य उत्तम जोगदंड, ठाणे जिल्हा पदाधिकारी कल्पना बोंबे हे उपस्थित होते. त्यांनी सदर महिलेचे कौतुक केले आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला.

 गेली जवळपास तीन दशके  बाळगलेल्या जटांचे निर्मूलन झाल्याने सदर महिला आणि त्यांचे कुटुंबिय अत्यंत आनंदित झाले दिसले आणि त्यांनी महा अंनिसचे मनःपूर्वक आभार मानले. आईच्या जटेचे निर्मूलन व्हावे म्हणून सदर महिलेची कन्या खूप प्रयत्न करीत होती. आज तिच्या प्रयत्नांना फळ आल्याने तिला गहिवरून आले होते.  यावेळी, ओळखीची अन्य कोणी जट-पीडित महिला आढळल्यास तिचे जटा-निर्मूलनासाठी मन वळविण्याचे आश्वासनही सदर महिला आणि कुटुंबियांनी दिले.    

ठाणे जिल्ह्यात आपल्या आस-पास कोणी जटा-पीडित महिला आढळून आल्यास आणि त्यांना जटांपासून मुक्ति हवी असल्यास गणेश शेलार (संपर्क क्र. ८६००१८०३०३) किंवा उत्तम जोगदंड (संपर्क क्र ९९२०१२८६२८) यांच्याशी संपर्क साधावा किंवा अन्य ठिकाणच्या लोकांनी जवळच्या महा अंनिस शाखेशी संपर्क साधावा असे आवाहन महा अंनिस तर्फे करण्यात आले आहे.

कल्याण, ठाणे

 प्रतिनिधी - कुणाल म्हात्रे 

___________