कोरोना रोखण्याचं ‘मुंबई मॉडल’ दिल्लीत राबवणार

मुंबई महापालिकेने कोरोना रोखण्यासाठी केलेल्या कामांची सर्वोच्च न्यायालयानेही दखल घेतली होती.

कोरोना रोखण्याचं ‘मुंबई मॉडल’ दिल्लीत राबवणार
corona update

कोरोना रोखण्याचं ‘मुंबई मॉडल’ दिल्लीत राबवणार

मुंबई महापालिकेने कोरोना रोखण्यासाठी केलेल्या कामांची सर्वोच्च न्यायालयानेही दखल घेतली होती.

मुंबई महापालिकेने कोरोना रोखण्यासाठी केलेल्या कामांची सर्वोच्च न्यायालयानेही दखल घेतली होती. मुंबईच मॉडलचा अभ्यास का करत नाही?, असा सवालही कोर्टाने दिल्ली सरकारला केला होता. त्यानंतर दिल्ली सरकारचं एक प्रतिनिधी मंडळ मुंबईत आलं होतं. या प्रतिनिधी मंडळाने मुंबईतील ‘वॉर्ड वॉर रुम’, जम्बो रुग्णालयांची पाहणी केली. (we can replicate Mumbai model in delhi)

दिल्ली सरकारच्या प्रतिनिधींनी नुकताच मुंबईचा अभ्यास दौरा केला होता. पालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांच्या मार्गदर्शनात या अभ्यास दौऱ्याचे नियोजन करण्यात आले. यावेळी अतिरिक्त महापालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी यांनी एका विशेष बैठकीदरम्यान संगणकीय सादरीकरण व सविस्तर चर्चा केली. यावेळी काकाणी यांनी कोविड रोखण्यासाठी पालिकेने राबविलेल्या उपाययोजनांची दिल्ली राज्य सरकारच्या प्रतिनिधींना माहिती दिली.


या दौऱ्यामध्ये दिल्ली सरकारच्या आरोग्य खात्याचे ज्येष्ठ अधिकारी डॉ. संजय अगरवाल आणि डॉ. धर्मेन्द्र कुमार यांचा प्रामुख्याने समावेश असणाऱ्या चमूने आपल्या अभ्यास दौऱ्यादरम्यान महानगरपालिकेने केलेल्या विविध स्तरीय कार्यवाहीची माहिती घेतली. या अंतर्गत प्रामुख्याने ‘वॉर्ड वॉर रुम’च्या माध्यमातून साध्य केलेले विकेंद्रीत व्‍यवस्‍थापन, रुग्णालयांच्या स्तरावर यशस्वीपणे राबविले प्राणवायू व्यवस्थापन आणि अल्पावधीत उभारलेल्या जम्बो रुग्णालयांची माहिती घेतली. 


दिल्ली राज्य सरकारच्या प्रतिनिधींनी पालिका करीत असलेले कोविड रुग्ण व्यवस्थापन आणि ‘बेड अलॉटमेंट’ समजावून घेण्यासाठी ‘डी’ व ‘के पूर्व’ या दोन विभागांच्या नियंत्रण कक्षांना भेट दिली. ज्या व्यक्तींना कोविड बाधा झाली आहे, त्यांचे वैद्यकीय चाचणी अहवाल हे सर्वप्रथम महापालिकेच्या ‘वॉर रुम’ कडे प्राप्त होतात. त्यानंतर रुग्णांशी दूरध्वनीद्वारे संवाद साधला जातो व त्यांचे प्राथमिक समुपदेशन देखील केले जाते. त्यानंतर आवश्यकतेनुसार महापालिकेचा चमू सदर व्यक्तीच्या घरी जाऊन आवश्यक ती वैद्यकीय तपासणी करतो.

पालिकेच्या अखत्यारीतील 1 हजार 800 खाटांच्या ‘सेव्हन हिल्स’ रुग्णालयात 18 मॅट्रिक टन ‘ऑक्सिजन’ पुरेसा असतो. मात्र खाटां तेवढीच संख्या असणाऱ्या 1 हजार 800 ‘बेड’च्या दिल्ली सरकारच्या अखत्यारीतील एका रुग्णालयात दररोज 32 मॅट्रिक टन ‘ऑक्सिजन’ लागतो. पालिकेने ऑक्सिजनचा सुयोग्य वापर करून प्रभावी रुग्णसेवा कशी साध्य केली आहे, याबाबतची माहिती देखील दिल्ली राज्य सरकारच्या प्रतिनिधींनी घेतली.


कोविड बाधित रुग्णांना परिणामकारक औषध उपचार मिळावेत म्हणून पालिकेने अत्यंत अल्प कालावधीत तात्पुरत्या स्वरूपातील 6 जम्बो कोविड रुग्णालयांची उभारणी केली. या सहा रुग्णालयांमध्ये तब्बल 8 हजार 915 खाटा असून 4 हजारांपेक्षा अधिक मनुष्यबळ या ठिकाणी अव्याहतपणे कार्यरत आहे. या रुग्णालयांच्या उभारणीबाबत व व्यवस्थापनाबाबत दिल्ली राज्य सरकारच्या प्रतिनिधींना अत्यंत औत्सुक्य होते.(we can replicate Mumbai model in delhi)

तिथे उपलब्ध असलेल्या सोयी सुविधा आणि करण्यात येत असलेली विविधस्तरीय उपाययोजनांची त्यांनी तपशीलवार माहिती घेतली.