युवकांनी कोरोना नंतरच्या काळात सामाजिक योगदान देणे गरजेचे
भाजपा भटके विमुक्त आघाडीचे प्रदेश संयोजक नरेंद्र पवार यांचे आवाहन, आदर्श शैक्षणिक समूह, पनवेल आयोजित ऑनलाइन चर्चा संपन्न.....

युवकांनी कोरोना नंतरच्या काळात सामाजिक योगदान देणे गरजेचे
भाजपा भटके विमुक्त आघाडीचे प्रदेश संयोजक नरेंद्र पवार यांचे आवाहन
आदर्श शैक्षणिक समूह, पनवेल आयोजित ऑनलाइन चर्चा संपन्न
कल्याण (kalyan) : कोरोनाचा (corona) काळ हा एकीकडे संकट असताना एका बाजूला आपल्याला बरंच काही शिकवून गेला आहे. देशात आणि समाजात नेमकं महत्वाचं काय आहे, कशाला महत्व दिले पाहिजे हेसुद्धा आता शासन आणि प्रशासनाच्या लक्षात आले आहे. वैद्यकीय सुविधा मोठ्या प्रमाणात हव्यात, डॉक्टर,परिचारिका आणि कोरोना (corona) योद्धे म्हणून आपले योगदान देणारे सर्वच घटक या काळात धाडसाने माणुसकी जपताना दिसले. येणाऱ्या कोरोना नंतरच्या काळात युवक म्हणून आपण सक्रियपणे सामाजिक योगदान दिले पाहिजे असे मत भाजपा भटके विमुक्त आघाडीचे प्रदेश संयोजक तथा माजी आमदार नरेंद्र पवार यांनी बोलताना केले.
आदर्श शैक्षणिक समूह, पनवेल आयोजित कर्मवीर भाऊराव पाटील यांची १३३ वी जयंती व शिक्षणमहर्षी बापूसाहेब डी. डी. विसपुते उर्फ ऋषीमहाराज यांच्या ५ व्या स्मृतिदिनानिमित्त "कोरोना नंतरची युवकांची भूमिका... एक नवे पर्व" या विषयांवर चर्चासत्र आयोजित केले होते. यावेळी पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनीही युवकांना मार्गदर्शन केले. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतीला अभिवादन करत शैक्षणिक क्षेत्रातील त्यांच्या कार्याची उजळणी यावेळी केली.
कोरोनाच्या (corona) काळामध्ये स्थलांतरित मजूर, सामान्य व्यक्ती आणि कष्टकरी समाजाचे प्रचंड हाल आणि नुकसान झाले आहे. समाजामध्ये या सर्व घटकांचे मोठे योगदान आहे. यानंतरच्या काळात ज्यांनी ज्यांनी कोरोनामध्ये काम केले, सामाजिक जबाबदारी पार पाडली त्यांना विसरू नका. आपण अभिनेत्यांना हिरो, नायक म्हणतो मात्र अभिनेता हा भूमिका करत असतो, खरे नायक आणि हिरो तर समाजासाठी अविरतपणे कार्यरत असतात. पोलीस, डॉक्टर, परिचारिका, स्वच्छता कर्मचारी असे कोरोना (corona) योद्धे हे खरे हिरो आहेत.
युवकांनीही आपल्या आपल्या ठिकाणी समाजासाठी काम करून नायक, हिरो होण्याचा प्रयत्न करा. आपण समाजाचे देणे लागतो यानुसार आपले योगदान द्या. युवकांची भूमिका महत्त्वाची आहे कारण युवक हा देशाचाच मुख्य आधार आहे, ऑनलाइन गेमिंगमागे धावत न जाता चांगल्या गोष्टींचे अनुकरण करा असेही आवाहन भाजपा भटके विमुक्त आघाडीचे प्रदेश संयोजक तथा माजी आमदार नरेंद्र पवार यांनी पुढे बोलताना केले. यावेळी आदर्श शैक्षणिक समूहाचे अध्यक्ष धनराज विसपुते, आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष महेंद्र विसपुते, डॉ. सीमा कांबळे आदी पदाधिकारी, प्राध्यापक, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
कल्याण , ठाणे
प्रतिनिधी - कुणाल म्हात्रे
______
Also see : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी...
https://www.theganimikava.com/Demand-of-Maharashtra-Navnirman-Sena