विलासरावांच्या तिन्ही सुनांचे फिल्मी बॅकग्राऊण्ड

अमित देशमुख यांची पत्नी अदिती प्रताप अभिनेत्री आहे, तर धीरज देशमुख यांची पत्नी दीपशिखा देशमुख निर्माती आहे.

विलासरावांच्या तिन्ही सुनांचे फिल्मी बॅकग्राऊण्ड

विलासरावांच्या तिन्ही सुनांचे फिल्मी बॅकग्राऊण्ड

Film background of Vilasrao's three daughters-in-law

अमित देशमुख यांची पत्नी अदिती प्रताप अभिनेत्री आहे, तर धीरज देशमुख यांची पत्नी दीपशिखा देशमुख निर्माती आहे.

महाराष्ट्राचे दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख  यांच्या तिन्ही सुपुत्रांनी आपापल्या क्षेत्रात दमदार वाटचाल सुरु केली आहे. ज्येष्ठ सुपुत्र अमित देशमुख यांच्याकडे महाराष्ट्राच्या वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक मंत्रिपदाची धुरा आहे, तर धाकटे पुत्र धीरज देशमुख  यांनी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवत पहिल्याच झटक्यात लातूरमधून आमदारकी मिळवली. तर मधला सुपुत्र रितेश देशमुख याने बॉलिवूडमध्ये आपलं नाणं खणखणीत वाजवलं. 

अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलिया देशमुख  यांची लव्ह स्टोरी सर्वश्रुत आहे. मात्र जेनेलियाच नाही, तर देशमुख कुटुंबाच्या इतर दोन सुनांचीही फिल्मी बॅकग्राऊण्ड आहे. अमित देशमुख यांची पत्नी अदिती प्रताप  प्रख्यात अभिनेत्री आहे, तर धीरज देशमुख यांची पत्नी दीपशिखा देशमुख निर्माती आहे. ती ज्येष्ठ चित्रपट निर्माते वासू भगनानी यांची कन्या आणि अभिनेता जॅकी भगनानी याची बहीण आहे.

अमित देशमुख यांनी वयाच्या अवघ्या 21 व्या वर्षी राजकारणात पाऊल ठेवलं. लातूर नगरपरिषद निवडणुकांसाठी त्यांनी काम केलं. 1999 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्यासाठी काम केलं. 2009 च्या विधानसभा निवडणुकीत विलासरावांच्या सीटवरुन अर्थात लातूर शहर विधानसभा मतदारसंघातून ते पहिल्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले. त्यांनी 89 हजार 480 इतक्या मताधिक्याने विजय मिळवला होता.

2009 पासून सलग तिसऱ्यांदा ते लातूर शहरचे काँग्रेस आमदार आहेत. 2014 मध्ये आघाडी सरकारच्या काळात अल्प कालावधीसाठी त्यांनी महसूल, अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे राज्यमंत्रिपद सांभाळले होते. 2019 मध्ये महाविकास आघाडी सरकारच्या काळात काँग्रेस पुन्हा सत्तेवर आल्यानंतर त्यांना वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक विभागाचे कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आले आहे.

45 वर्षीय अमित देशमुख आणि अदिती प्रताप यांचा विवाह 2008 मध्ये झाला. त्यांना अवीर आणि अवान ही दोन मुलं आहेत. अदिती प्रताप हिने लग्नापूर्वी सात फेरे, मान यासारख्या मालिकांमध्ये अभिनय केला आहे. जवळपास सात वर्ष तिने अभिनय आणि मॉडेलिंग केलं. उर्मिला मातोंडकरची भूमिका असलेल्या बनारस- अ मिस्टिक लव्ह स्टोरी या सिनेमातही अदिती झळकली होती.

अदितीचं बालपण बंगळुरु आणि दिल्लीत गेलं. त्यानंतर मनोरंजन विश्वात येण्यासाठी तिने मुंबई गाठली. सात फेरे या पहिल्याच मालिकेत तिला मोठा ब्रेक मिळाला होता. अदिती घराघरात पोहोचली होती. तिच्या सासूबाई वैशाली देशमुख यांनाही अदितीचं मालिकेतील काम पसंतीस पडलं होतं.

अदिती आणि अमित यांचा विवाह झाला, त्यावेळी विलासराव महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. अदिती आणि अमित यांचे लव्ह मॅरेज असेल, असा अनेकांनी ठोकताळा बांधला होता. मात्र आमच्या कुटुंबांनी हे लग्न ठरवलंय, असं सांगत अदितीने त्यावेळी हे अरेंज मॅरेज असल्याचं स्पष्ट केलं होतं. मुख्यमंत्र्यांच्या सूनबाई होण्याचा आनंद तेव्हा तिच्या चेहऱ्यावर दिसत होता.

विलासरावांचे धाकटे पुत्र, 41 वर्षीय धीरज देशमुख हे लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत. पहिल्याच निवडणुकीत ते 1 लाख 21 हजार 482 च्या मताधिक्याने निवडून आले. हे त्यावेळी राज्यातील तिसऱ्या क्रमांकाचं विक्रमी मताधिक्य ठरलं होतं. धीरज यांनी युथ काँग्रेसचे जिल्हाप्रमुख म्हणून काम पाहिलं आहे. तर 2017 मध्ये ते लातूर जिल्हा परिषदेचे सदस्य होते.

ज्येष्ठ चित्रपट निर्माते वासू भगनानी यांची कन्या आणि अभिनेता जॅकी भगनानी याची बहीण दीपशिखा धीरज देशमुख यांची पत्नी आहे. 2012 मध्ये धीरज आणि दीपशिखा विवाहबंधनात अडकले. त्यांना वंश आणि दिवियाना अशी दोन मुलं आहेत. दीपशिखाने पूजा एंटरटेनमेंट अंतर्गत अनेक चित्रपटांची निर्मिती केली आहे.

याशिवाय दीपशिखाने लव्ह ऑर्गेनिकली  या स्कीनकेअर ब्रँडची स्थापना केली आहे. ग्रामीण भागात शेतकऱ्यांना योग्य भाव मिळावा यासाठी धीरज आणि दीपशिखा काम करत आहेत.

दीपशिखाला पॉवर वुमन, यंग एन्टरप्रिन्युअर अशा अनेक पुरस्कारांनीही गौरवण्यात आलं आहे.