ऊसतोड मुकादम व मजुरांच्या कष्टाचे मोल झाल्याशिवाय आता संपातून माघार नाही - आ.सुरेश धस 

वडवणी येथील संयुक्त चर्चासत्रात मुकादम व मजुरांनी एकजुटीची वज्रमूठ बांधली 

ऊसतोड मुकादम व मजुरांच्या कष्टाचे मोल झाल्याशिवाय आता संपातून माघार नाही - आ.सुरेश धस 
There is no turning back from the strike unless the hard work of sugarcane workers is appreciated MLA Suresh Dhas

ऊसतोड मुकादम व मजुरांच्या कष्टाचे मोल झाल्याशिवाय आता संपातून माघार नाही - आ.सुरेश धस 

वडवणी येथील संयुक्त चर्चासत्रात मुकादम व मजुरांनी एकजुटीची वज्रमूठ बांधली 

वडवणी तालुका आजवर ऊसतोड मजूर व मुकादम यांच्या कष्टाचे पाणी करण्याचे काम साखरसंघ व कारखानदार यांनी केले आहे. परंतु आता बस झाले, ज्या ऊसतोड मुकादम व कामगारांच्या जीवावर कारखानदारी चालते अशा साखर सम्राटांनी व साखर संघाने संपामध्ये फूट पाडण्याचा कदापी प्रयत्न करू नये कारण तो कधीच यशस्वी होणार नाही. ऊसतोड मुकादम व मजुरांच्या कष्टाचे मोल झाल्याशिवाय आता संपातून माघार नाही म्हणजे नाहीच. असे रोखठोक विचार वडवणी येथील ऊसतोड मजूर मुकादम संघटना संयुक्त चर्चासत्रात आ.सुरेश अण्णा धस यांनी व्यक्त केले. दरम्यान याच संयुक्त चर्चासत्रात उपस्थित सर्व मुकादम व मजुरांनी यावेळी एकजुटीची वज्रमूठ बांधली.

याबाबत अधिक माहिती अशी की, महाराष्ट्रातील ऊसतोड मजूर व मुकादमांच्या दरवाढ व कायद्यात रुपांतर या मागण्यांसाठी संपूर्ण महाराष्ट्रभर चळवळ उभी राहिली असून दिवंगत लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे साहेब यांनी सुरु केलेल्या तसेच महाराष्ट्राच्या ऊसतोड मजूर मुकादमांच्या नेत्या माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली व उस्मानाबाद-बीड-लातूर स्थानिक स्वराज्य संस्थेचे तीन जिल्ह्याचे दबंग आमदार सुरेश अण्णा धस यांच्या मुख्य मार्गदर्शनाखाली ऊसतोड मजूर मुकादम संघटना संयुक्त चर्चासत्राची संघर्ष यात्रा सध्या सुरू असून आ.सुरेश धस हे संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करून प्रत्येक जिल्ह्यात जाऊन गावोगावी ऊसतोड मुकादम व मजुरांच्या प्रत्यक्ष गाठीभेटी घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेत त्यांच्या न्याय व हक्कासाठी संघर्ष उभा करीत आहेत. याच अनुषंगाने वडवणी तालुक्यातील ऊसतोड मजूर व मुकादम संघटना यांच्या संयुक्त चर्चासत्राचे आयोजन स्व.गोपीनाथराव मुंडे साहेब ऊसतोड मुकादम व वाहतूक संघटना महाराष्ट्र राज्य व महाराष्ट्र राज्य श्रमिक संघटना यांच्या वतीने वडवणी येथील गजानन जिनिंग याठिकाणी काल दिनांक २ सप्टेंबर २०२० शुक्रवार रोजी दुपारी आयोजित करण्यात आले होते.

यावेळी या चर्चासत्राचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून आ.सुरेश अण्णा धस, महाराष्ट्र राज्य श्रमिक संघटनेचे नेते दत्तोपंत भांगे, ज्येष्ठ नेते राजाभाऊ अण्णा मुंडे, धारूर बाजार समितीचे सभापती महादेवराव बडे, युवा नेते बाबरी मुंडे, युवा नेते भारत जगताप, शेख समशेर भाई यांसह वडवणी व धारूर तालुक्यातील असंख्य मेन मुकादम, मुकादम, ऊसतोड कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी दत्तोपंत भांगे, महादेवराव बडे, भारत जगताप, बाबरी मुंडे व शेवटी राजाभाऊ मुंडे यांनी आपली मनोगते व्यक्त करून ऊसतोड मुकादम व मजुरांच्या लढ्याचे व्यापक स्वरूप स्पष्ट केले. तसेच आ.सुरेश धस यावेळी पुढे बोलताना म्हणाले की, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बीड जिल्हा ऊसतोड मुकादम व मजुरांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. महाराष्ट्रातील एकूण ऊसतोड मजुरांच्या संख्येपैकी जवळपास पन्नास टक्के प्रमाणे हे बीड जिल्ह्यातील ऊसतोड मजुरांचे आढळते व बीड जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त ऊसतोड मुकादम व मजुरांची संख्या वडवणी व धारूर या दोन तालुक्यांमध्ये प्रामुख्याने आढळते.

आजवर या बीड जिल्ह्याच्या ऊसतोड मुकादम व मजुरांच्या घामाच्या बळावर राज्यातील कारखानदारी नव्हे तर देशातील कारखानदारी चालते. असे असतानाही त्यांच्या हक्काच्या न्याय व मागण्या दुर्लक्षितच आढळतात. लोकनेते स्व.गोपीनाथराव मुंडे साहेब यांनी आयुष्यभर ऊसतोड मुकादम मजूर वाहतूकदार यांना न्याय मिळवून देण्यासाठी संघर्ष केला तसेच त्यांच्याच काळात ऊसतोड मुकादम व मजुरांना ३५ टक्के व ७० टक्के अशी दोन वेळेस दरवाढ मिळाली होती. मात्र त्यानंतर दरवाढीअभावी आजही हा वर्ग उपेक्षित आहे. आता मुंडे साहेबांच्या पश्चात त्यांच्या कन्या माजी मंत्री पंकजाताई मुंडे ह्या लवाद समितीच्या अध्यक्ष असून त्यांच्याच नेतृत्वाखाली संपाचा अंतिम निकाल मुंबईला नव्हे तर गोपीनाथ गडावर होईल. एक ऊसतोड मजूर फक्त ९२ रुपयात दिवसातील २४ तासांपैकी १९ तास फडात घाम गळताना आढळतो. मात्र या मजुरांच्या या घामाच्या कष्टाचे योग्य मोल आजवर त्याला मिळाले नाही हे दुर्दैव म्हणावे लागेल. ऊसतोड मुकादम यांना ३७ टक्के तर मजुरांना १५० टक्के दरवाढ मिळाल्याशिवाय तसेच ऊसतोड कामगारांसाठीचा कायद्याचा शासन निर्णय झाल्याशिवाय माझे हे बहाद्दर ऊसतोड मुकादम व मजूर संपातून माघार घेणार नाहीत.

साखर संघ व कारखानदारांची आता खैर नाही दरवाढ घेतल्याशिवाय व कायदा पारित झाल्याशिवाय कोयता हातात घेणार नाही व कोणालाही घेऊ देणार नाही. आजवर आमच्या संसारावर बिबवा घालून आता यापुढे तुमचा संसार सुखी होणार नाही हे ध्यानात राहू द्या. तुटपुंज्या रक्कमेवर आयुष्य वेचणाऱ्या ऊसतोड मजुरांनाही जरासं सुखाचं आयुष्य जगू द्या. त्यांच्या कष्टाचे मोल झाल्याशिवाय आता माघार नाही म्हणजे नाहीच. असे घणाघाती विचार वडवणी येथील ऊसतोड मजूर मुकादम संघटना संयुक्त चर्चासत्रात शेवटी आ.सुरेश अण्णा धस यांनी व्यक्त केले. दरम्यान याच संयुक्त चर्चासत्रात उपस्थित सर्व मुकादम व मजुरांनी यावेळी एकजुटीची वज्रमूठ बांधली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुग्रीव मुंडे यांनी केले तर शेवटी सर्व उपस्थितांचे आभार बाबरी मुंडे यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी युवा नेते बाबरी मुंडे, नगरसेवक शेषेराव जगताप, सरपंच हरी पवार, बंडू नाईकवाडे, संतोष बहिरे, महादेव शेंडगे, महादेव शेळके, राहुल वाघमोडे यांसह आदींनी परिश्रम घेतले.

बीड
प्रतिनिधी - विश्वनाथ शरणांगत

__________

Also see : केमिकल युक्त सांडपाणी सोडून नाला दुषित करणाऱ्या कारखान्यांवर कारवाईची शिवसेनेची मागणी 

https://www.theganimikava.com/Shiv-Sena-demands-action-against-factories-polluting-nala-by-discharging-chemical-effluent