माणुसकीचे नाते दृढ करणाऱ्या सेवावृत्तींचा सन्मान प्रेरणादायी

राजेश पांडे यांचे मत; सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सतर्फे 'सूर्यगौरव राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार' वितरण..

माणुसकीचे नाते दृढ करणाऱ्या सेवावृत्तींचा सन्मान प्रेरणादायी
Respect for the service spirit that strengthens the relationship of humanity is inspiring

माणुसकीचे नाते दृढ करणाऱ्या सेवावृत्तींचा सन्मान प्रेरणादायी

राजेश पांडे यांचे मत; सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सतर्फे 'सूर्यगौरव राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार' वितरण

पुणे : "कोरोनाने माणसातील जातीभेद नष्ट करत सेवाकार्य हेच अधिक महत्वपूर्ण असल्याचे अधोरेखित केले आहे. लॉकडाऊनच्या काळात लाखो लोकांना अन्न, आरोग्यसुविधा पुरविण्याचे काम अनेक सेवावृत्तींनी केले. माणुसकीचा बंध घट्ट करणाऱ्या या सेवाकार्य करणाऱ्या व्यक्तिमत्वाचा सन्मान आपल्या सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे," असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सिनेटचे सदस्य व नॅशनल युथ को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे चेअरमन राजेश पांडे यांनी व्यक्त केले.

सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटतर्फे दिल्या जाणाऱ्या सूर्यगौरव राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. 'सूर्यगौरव आंतरराष्ट्रीय पुरस्कार' स्ट्रॅटेजिक फोरसाइट ग्रुपचे सचिन इटकर, भाजप नेत्या श्वेता शालिनी, प्रजापिता ब्रह्माकुमारीच्या सरिता दीदी, पत्रकार राजू वाघमारे, उद्योजक डॉ. दीपक तोष्णीवाल, सामाजिक कार्यकर्ते डॉ. राजेश बाहेती यांना, तर 'सुर्यगौरव राष्ट्रीय पुरस्कार' राजेश पांडे, 'रक्ताचे नाते' संस्थेचे राम बांगड, 'जागृती ग्रुप'चे राज देशमुख, कौशल्य विकास क्षेत्रातील संजय गांधी, युवा सामाजिक कार्यकर्ते किरण साळी, जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग, 'उचित माध्यम'चे संचालक जीवराज चोले यांना प्रदान करण्यात आला. 'सूर्यदत्ता'च्या बावधन प्रांगणातील बन्सीरत्न सभागृहात झालेल्या या सोहळ्याप्रसंगी 'सुर्यदत्ता'चे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया, कार्यकारी संचालक प्रा. अक्षीत कुशल, मुख्य विकास अधिकारी प्रा. रामचंद्रन यांच्यासह शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

राजेश पांडे म्हणाले, "तरुणांमध्ये मोठी क्षमता असते. त्यांना दिशा दिली, तर त्यांच्या हातून भरीव कार्य घडते. राष्ट्रीय सेवा योजनेतील विद्यार्थ्यांना आम्ही मास्क शिवण्याचा उपक्रम दिला. आजवर ७० हजार विद्यार्थ्यांनी मिळून जवळपास ३५ लाख मास्क शिवले आहेत. त्याचबरोबर गेल्यावर्षी हरित वारी उपक्रमात पालखी मुक्कामावर विद्यार्थ्यांनी स्वच्छता केली होती. विद्यापीठात एक लाख वृक्षलागवडीचा कार्यक्रम झाला होता. त्याची नोंद अनेकांनी घेतली."

सचिन इटकर म्हणाले, "लॉकडाऊनमुळे हातावरचे पोट असणाऱ्या लोकांचे हाल होत होते. त्यावेळी समाजातील अनेक सेवाभावी व्यक्ती आणि संस्थांनी त्यांना आधार दिला. अशा व्यक्ती-संस्थांना सन्मानित करून सूर्यदत्ता परिवाराने सेवेचे आदर्श उदाहरण घालून दिले आहे."

श्वेता शालिनी म्हणाल्या, "सूर्य जसा शाश्वत आणि प्रेरणादायी असतो, तसेच निस्वार्थ सेवाकार्य आपल्या सगळ्यांकरिता प्रेरणा देणारे असते. भारतीयांनी आलेल्या या संकटाचा सामना धैर्याने केला. लोकांनी एकत्र येऊन एकमेकांना सहकार्य भावनेतून नाते जपले. संकटाला संधी मानून काम करण्याची प्रेरणा पंतप्रधानांनी दिली."

डॉ. दीपक तोष्णीवाल म्हणाले, "कोरोना काळात अडकलेल्या लोकांना आरोग्य सुविधा, निवास-भोजनाची सुविधा उपलब्ध करून दिली. अनेक सोसायट्यांमध्ये विलगीकरण कक्ष उभारण्यासाठी पुढाकार घेतला. कोरोनाच्या या लढ्यात अनेक डॉक्टर, पोलिसांनी आपले जीवनदान दिले. त्यांच्याप्रती आपण कृतज्ञ राहावे.

राम बांगड म्हणाले, "रक्ताची, प्लाझ्माची आज मोठी गरज आहे. राज्याच्या विविध भागातून, तसेच बाहेरूनही प्लाझ्माला मागणी आहे. पुणेकरांचे त्यात योगदान मोठे आहे. जास्तीत जास्त गरजूना रक्त आणि प्लाझ्मा पुरविण्यासाठी प्रयत्न करत आहोत. मी स्वतः तीनवेळा प्लाझ्मादान केले आहे. त्यामुळे लोकांनी पुढे येऊन प्लाझ्मा, रक्तदान करावे."

सरिता दीदी म्हणाल्या, "भारतीयांनी निस्वार्थ दातृत्वाची भावना आहे. सेवेची संधी मिळणे हा ईश्वराचा प्रसाद असतो. आपण लोकांच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कोरोनाच्या भीतीने अनेकांना जीव गमवावा लागला. त्यामुळे निडर बनून लोकांना कोरोनाच्या भीतीपासून दूर नेले पाहिजे. आपल्यातील करुणा जागृत ठेवून त्यांच्यासाठी काम करावे."

राजेंद्र सरग म्हणाले, "या कठीण काळात अफवांचे पीक वाढत असताना माहिती खात्याकडून अधिकृत बातम्या देण्याचे काम करता आले. विभागीय कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय आणि महानगरपालिका यांच्यातील निर्णयाची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम गेल्या सात महिन्यात नियमितपणे केले."

राजेश बाहेती म्हणाले, "समाजातील अनेकांना गरज होती आणि ती पूर्ण करण्याचे काम ईश्वराने माझ्या हातून करून घेतले. कम्युनिटी किचनच्या माध्यमातून लाखो लोकांना जेवण देण्याचे सत्कर्म आमच्या हातून घडले." राज देशमुख यांनी जागृती ग्रुपच्या माध्यमातून, तसेच पायी जाणाऱ्या मजुरांसाठी कोरोना काळात केलेल्या कार्याबद्दल सांगितले.

संजय गांधी यांनी कौशल्य विकास क्षेत्रात करत असलेल्या कार्याविषयी माहिती दिली. जीवराज चोले यांनी विद्यार्थी सहायक समिती, माजी विद्यार्थी मंडळ आणि पत्रकार मित्र परिवाराच्या माध्यमातून कोरोना काळात केलेल्या कार्याविषयी सांगितले. मनोगत व्यक्त केले. प्रा. डॉ. संजय चोरडिया यांनी पुरस्कार सोहळ्यामागील भूमिका स्पष्ट केली. प्रा. सुनील धनगर यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. रामचंद्रन यांनी आभार मानले.

पुणे

प्रतिनिधी - अशोक तिडके 

_______________

Also see :फर्ग्युसन महाविद्यालयाच्या शुल्कवाढीला रयत विद्यार्थी परिषदेचा विरोध

https://www.theganimikava.com/Rayat-Student-Council-opposes-Fergusson-College-fee-increase