आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला हायकोर्टात

याचिकेत राज्य सरकार, पोलीस महासंचालक, मुंबई पोलीस आयुक्त आणि एसपी सायबर यांना प्रतिवादी करण्यात आले आहे.

आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला हायकोर्टात
Rashmi Shukla news

आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला हायकोर्टात

IPS officer Rashmi Shukla in the High Court

याचिकेत राज्य सरकार, पोलीस महासंचालक, मुंबई पोलीस आयुक्त आणि एसपी सायबर यांना प्रतिवादी करण्यात आले आहे. 

मुंबई पोलिसांनी पाठवलेल्या समन्स प्रकरणी वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी हैद्राबाद हायकोर्टात धाव घेतली आहे. चौकशीस बोलावण्याबाबत दिलेल्या समन्सला स्थगिती देण्याची याचिका रश्मी शुक्लांनी केली आहे. चौकशी अधिकारी छळ करत असल्याचा आरोपही शुक्ला यांनी केला आहे. 

रश्मी शुक्ला यांनी 29 एप्रिलला याचिका दाखल केली होती. 6 मे रोजी या प्रकरणी हैद्राबाद हायकोर्टात सुनवाणी होणार आहे. मुंबई पोलिसांनी दोन वेळेला समन्स पाठवला होता. मुंबई पोलिसांनी आज चौकशीसाठी बोलावले होते. पोलिसांच्या पोस्टिंगबाबत गोपनीय कागदपत्रं लीक केल्या प्रकरणी मुंबई पोलिसांनी समन्स पाठवले होते.

चौकशी अधिकारी छळ करत असल्याचा आरोप रश्मी शुक्ला यांनी याचिकेत केला आहे. याचिकेत राज्य सरकार, पोलीस महासंचालक, मुंबई पोलीस आयुक्त आणि एसपी सायबर यांना प्रतिवादी करण्यात आले आहे.

दरम्यान, माजी गृहमंत्री अनिल देशमुख  यांनी शंभर कोटींच्या वसुलीचे आदेश दिल्याचा आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह  यांनी केला होता. या प्रकरणात सीबीआय शुक्ला यांना साक्षीदार करणार आहे. 

एसआयडीमध्ये कार्यरत असताना काही मंत्र्यांचे फोन बेकायदेशीरपणे टॅप केल्याचा आरोप रश्मी शुक्ला यांच्यावर आहे. याप्रकरणी जबाब नोंदवण्यासाठी बुधवार 28 एप्रिल रोजी सायबर पोलीस स्टेशनमध्ये हजर राहण्यास शुक्लांना समन्समध्ये सांगण्यात आले होते.

रश्मी शुक्ला यांनी सायबर पोलिसांना सध्या चौकशीला येऊ शकणार नसल्याचं कळवलं आहे. कोरोनाची परिस्थिती पाहता हजेरी शक्य नसल्याचं उत्तर रश्मी शुक्ला यांनी सायबर पोलिसांनी दिलेल्या समन्सला दिलं.

महाराष्ट्र केडरच्या आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला सध्या हैद्राबादमध्ये केंद्रीय प्रतिनियुक्तीवर आहेत. त्यामुळे सध्याची कोरोनाची परिस्थिती पाहता रश्मी शुक्ला यांना मुंबईत चौकशीला हजर राहता येणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. चौकशीची खूपच घाई असेल, तर प्रश्न पाठवून द्या, त्याची उत्तरे देईन, असं रश्मी शुक्ला यांनी सायबर सेलला सांगितलं.

रश्मी शुक्ला सध्या केंद्रीय राखीव पोलीस दलात अतिरिक्त महासंचालक पदावर हैदराबाद येथे कार्यरत आहेत. फेब्रुवारी महिन्यापासून त्या केंद्रात प्रतिनियुक्तीवर आहेत.