पंढरपूर पोटनिवडणुकीत ‘नोटा’लाही अधिक मतं

अभिजीत बिचुकले यांना 137 मतं मिळाली आहेत. एकूण वीस उमेदवार असलेल्या या पोटनिवडणुकीत बिचुकले 16 व्या क्रमांकावर फेकले गेले .

पंढरपूर पोटनिवडणुकीत ‘नोटा’लाही अधिक मतं
Pandharpur Assembly Election

पंढरपूर पोटनिवडणुकीत ‘नोटा’लाही अधिक मतं

More votes for 'money' in Pandharpur by-election

अभिजीत बिचुकले यांना 137 मतं मिळाली आहेत. एकूण वीस उमेदवार असलेल्या या पोटनिवडणुकीत बिचुकले 16 व्या क्रमांकावर फेकले गेले .

पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या रिंगणात  उडी घेतलेले ‘बिग बॉस मराठी’ फेम अभिजीत बिचुकले  यांचं डिपॉझिट पुन्हा जप्त झालं आहे. पोटनिवडणुकीत त्यांना केवळ 137 मतं पडली आहेत. भाजपच्या समाधान आवताडे  यांनी राष्ट्रवादीच्या तिकीटावर उतरलेले महाविकास आघाडीचे उमेदवार भगीरथ भालके  यांचा पराभव केला. 

निवडणुकीच्या निकालात डिपॉझिट जप्त होण्याची परंपरा अभिजीत बिचुकले यांनी कायम राखली आहे. निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरील माहितीनुसार अभिजीत बिचुकले यांना 137 मतं मिळाली आहेत. एकूण वीस उमेदवार असलेल्या या पोटनिवडणुकीत बिचुकले 16 व्या क्रमांकावर फेकले गेले आहेत. बिचुकलेंसह एकूण 10 उमेदवार अपक्ष म्हणून मैदानात उतरले होते. बिचुकलेंना मतदान झाल्यापैकी 0.06 टक्के मतं मिळाली.

विशेष म्हणजे ‘नोटा’चं बटणही अधिक मतदारांनी दाबलं. कारण 599 जणांनी नकाराधिकाराचा वापर केला आहे. बळीराजा पक्षाचे उमेदवार डॉ. राजाराम भोसले 69 मतांसह तळाला आहेत.भाजप उमेदवार समाधान आवताडे यांना 1 लाख 9 हजार 450 मतं मिळाली, तर दुसऱ्या क्रमांकावर राहिलेले राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांना 1 लाख 5 हजार 717 मतं पडली.

अभिजित बिचुकले यांचा सामाजिक, राजकीय, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील वावर कायम चर्चेचा विषय असतो. आतापर्यंत बिचुकले यांनी लोकसभा, विधानसभा अगदी राष्ट्रपतीपदासाठीची निवडणूक लढवून झाली आहे. मात्र, आतापर्यंत कोणत्याची निवडणुकीत त्यांच्या गळ्यात विजयाची माळ पडलेली नाही. यासाठीच ख्यातकीर्त असलेले बिचुकले सुरुवातील स्थानिक पातळीवर फेमस होतेच. मात्र ‘बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या पर्वात सहभागी झाल्यामुळे त्यांना राज्यभर प्रसिद्धी मिळाली आणि आता ते अधिकच चर्चेचा विषय ठरु लागले.

विठुरायाच्या नगरीची झालेली दुर्दशा बघवत नाही. राज्यातील उद्दाम प्रशासकीय अधिकाऱ्यांना वठणीवर आणण्यासाठी मी ही निवडणूक लढवत असल्याचे बिचुकले यांनी सांगितले होते. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणूक प्रक्रिया थांबवावी, अशी मागणीही त्यांनी केली होती. 

काही महिन्यांपूर्वीच पुणे पदवीधर मतदारसंघाची निवडणूकही बिचुकले यांनी लढवली होती. मात्र, त्यावेळी मतदानाला गेलेल्या बिचुकले यांचे नावच मतदार यादीत सापडले नव्हते. त्यामुळे अभिजित बिचुकले यांना मतदानापासून वंचित राहावे लागले होते.

त्यापूर्वी 2019 मध्ये अभिजित बिचुकले यांनी वरळी मतदारसंघातून थेट शिवसेनेच्या आदित्य ठाकरे यांच्याविरोधात शड्डू ठोकला होता. मात्र तिथेही त्यांच्यावर डिपॉझिट जप्त करुन घेण्याची नामुष्की ओढावली होती.