हत्येचं गूढ पाच दिवसात उकललं, महिलेसह तिघांना अटक

जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथील ओमसाई नगरातील पाटील दाम्पत्याची हत्या झाली होती. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पाचव्या दिवशी खुनाचा उलगडा केला आहे.

हत्येचं गूढ पाच दिवसात उकललं, महिलेसह तिघांना अटक
Jalgaon Couple killed

 हत्येचं गूढ पाच दिवसात उकललं, महिलेसह तिघांना अटक

Mystery of murder solved in five days, three arrested including woman

जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथील ओमसाई नगरातील पाटील दाम्पत्याची हत्या झाली होती. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पाचव्या दिवशी खुनाचा उलगडा केला आहे.

जळगावातील दाम्पत्याच्या हत्येचे गूढ उकलण्यात पोलिसांना पाच दिवसात यश आले आहे. मयत आशाबाईकडून व्याजावर घेतलेला पैसा माफ होईल शिवाय तिच्याकडील सोने-नाणेही मिळेल, या अपेक्षेने पाटील दाम्पत्याची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी एका महिलेसह तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.

जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथील ओमसाई नगरातील पाटील दाम्पत्याची हत्या झाली होती. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पाचव्या दिवशी खुनाचा उलगडा केला आहे. या हत्याकांड प्रकरणी दोन पुरुष आणि एका महिलेला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

मयत आशाबाईकडून व्याजावर घेतलेला पैसा माफ हाईल आणि तिच्याकडील रोकड आणि सोन्याचे घबाड हाती लागेल या बेताने खुनाचा कट रचला गेल्याचे जिल्‍हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

जळगाव तालुक्यातील कुसुंबा भागातील ओमसाई नगरात 54 वर्षीय मुरलीधर राजाराम पाटील आपली 47 वर्षीय पत्नी आशाबाई पाटील हिच्यासह राहत होते. वर्षभरापूर्वीच घर बांधून दोघे तिथे राहण्यास गेले होते. मात्र गेल्या आठवड्यात या दोघांचा राहत्या घरात दोरीने गळा आवळून खून करण्यात आला होता.

आई फोन उचलत नसल्यामुळे आशाबाईंच्या लेकीने आजीला फोन केला. आजीने तिच्या दुसऱ्या जावयाला फोन करुन पाटील यांच्या घरी जाण्यास सांगितलं. नातेवाईक गेले असता त्यांच्या घराचा दरवाजा उघडा होता. दुमजली घराच्या खालच्या मजल्यावरील शेवटच्या खोलीत आशाबाई मृतावस्थेत पडल्या होत्या. तर बाहेर गच्चीच्या एका कोपऱ्यात मुरलीधर पाटील गतप्राण झाले होते.

एमआयडीसी पोलिसांत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस पथकाने सलग सहा रात्र आणि पाच दिवसांचा तपास पूर्ण करुन चार संशयितांना ताब्यात घेतले. दोन महिला आणि दोन पुरुष अशा चार संशयितांना ताब्यात घेतले. कसून चौकशी केल्यावर गुन्ह्यातील प्रत्यक्ष सहभागी असल्याची तिघांनी कबुली दिली. त्यामुळे तिघांना पोलिसांकडून अटक करण्यात आली.

त्यात देविदास नादेव श्रीनाथ, अरुणाबाई गजानन वारंगे आणि सुधाकर रामलाल पाटील या तिघांचा समावेश आहे.