पिंपरी चिंचवड मध्ये ढगांचा गडगडाट व विजांच्या कडकडाटासह सुमारे एक तास मुसळधार पाऊस ...
रविवार सुटीचा दिवस, काही जण खरेदीसाठी, तर काही जण नातेवाइकांच्या भेटीसाठी घराबाहेर पडलेले.....

पिंपरी चिंचवड मध्ये ढगांचा गडगडाट व विजांच्या कडकडाटासह सुमारे एक तास मुसळधार पाऊस ...
पिंपरी (pimpri) : रविवार सुटीचा दिवस, काही जण खरेदीसाठी, तर काही जण नातेवाइकांच्या भेटीसाठी घराबाहेर पडलेले. सायंकाळी घराकडे परतण्याची वेळ. पण, त्याच वेळी आकाशात ढग दाटून आले आणि धो-धो बरसले. ढगांचा गडगडाट व विजांच्या कडकडाटासह सुमारे एक तास मुसळधार पाऊस झाला. अवघ्या काही मिनिटांत रस्त्यांवर पाणी साचले. त्यामुळे अनेकांची तारांबळ उडाली.
शहर परिसरात दिवसभर कडाक्याचे ऊन होते. मात्र, दुपारी चारच्या सुमारास काही ठिकाणी पावसाच्या सरी बरसल्या. अर्ध्या तासातच पावसाने विश्रांती घेतली. आकाशही निरभ्र झाले. मात्र, साडेपाचच्या सुमारास पुन्हा ढग दाटून आले. साडेसहालाच अंधार पडला. विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. काही भागातील वीजपुरवठाही खंडित झाला. पथदिवेही बंद पडल्याने वाहनचालकांना समोरील रस्ताही दिसत नव्हता. त्यामुळे अनेकांनी रस्त्याच्या कडेला वाहन उभी केली. दुचाकी चालकांनी रेनकोट असतानाही उड्डाणपूल, भुयारी मार्ग व ग्रेडसेपरेटरचा आसरा घेतला. सुमारे तासाभराने पावसाचा जोर ओसरला.
पिंपरी चिंचवड
प्रतिनिधी - आत्माराम काळे
______
Also see : समता सामाजिक फाऊंडेशनच्या वतीने आमदार किसन कथोरे यांचा वाढदिवस साजरा
https://www.theganimikava.com/Birthday-of-MLA-Kisan-Kathore-on-behalf-of-Samata-Social-Foundation